मुंबई. दिल्लीतील निझामुद्दीन परिसरात तबलीगी जमातला एकत्रित येण्याची परवानगी कुणी दिली असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. तबलीगी जमातला देशात कोरोना व्हायरसचे सेंटर ठरवण्याचा प्रयत्न सुरू असताना पवारांची ही प्रतिक्रिया समोर आली आहे. फेसबूक लाइव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधताना शरद पवार बोलत होते. यावेळी महाराष्ट्र सरकारने त्यापूर्वीच तबलीगी जमातच्या एका कार्यक्रमाला परवानगी नाकारली होती. मग, दिल्लीतील कार्यक्रमाला कुणी परवानगी दिली असा सवाल त्यांनी केला.
जमातच्या कार्यक्रमाला महाराष्ट्र सरकारने परवानगी नाकारली, मग दिल्लीत कुणी दिली?
शरद पवार म्हणाले, "मुंबई आणि सोलापूरमध्ये कार्यक्रमाच्या निमित्ताने मोठ्या संख्येने लोक एकवटणार होते. परंतु, महाराष्ट्र सरकारने त्याची परवानगी दिली नाही. यापैकी मुंबईत कार्यक्रम होण्यापूर्वीच त्याची परवानगी नाकारण्यात आली. तर सोलापूरमध्ये झालेल्या कार्यक्रमाच्या विरोधात आयोजकांवर कारवाई करण्यात आली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख अशा स्वरुपाचे निर्णय घेऊ शकतात तर मग, दिल्लीत जमातच्या कार्यक्रमाला परवानगी कुणी दिली?" असा सवाल पवारांनी उपस्थित केला.
जमातवरून माध्यमांनी अतिश्योक्ती केली -पवार
निझामुद्दीन येथील जमात आणि त्यावरून माध्यमांवर पसरवल्या जाणाऱ्या वृत्तांवरून पवारांनी माध्यमांचा देखील खरपूस समाचार घेतला. "माध्यमांनी या मुद्द्यावरून अतिश्योक्ती करण्याची गरज काय होती? यामुळे विनाकारण एका विशिष्ठ समुदायाला लक्ष्य केले जात आहे."
उल्लेखनीय बाब म्हणजे, मीडिया रिपोर्टनुसार, कोरोनामुळे आतापर्यंत 400 कोरोना पॉझिटिव्ह आणि 15 मृत्यूंचा संबंध थेट गेल्या महिन्यात दिल्लीत झालेल्या जमातच्या कार्यक्रमाशी आहे. या कार्यक्रमात विविध देशांतून 9 हजारपेक्षा अधिक मुस्लिम एकवटले होते.