मरकजच्या लोकांवर उपचार नको, गोळ्या घालून ठार मारा : राज ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया


मुंबई. मरकजमधला प्रकार संतापजनकच आहे. ज्यांना देशापेक्षा धर्म मोठा वाटत असेल, किंवा ह्या आपत्तीत काही कारस्थान रचावे असे वाटत असेल तर अशा लोकांवर उपचार करण्यापेक्षा त्यांना गोळ्या घालून ठार मारले पाहिजे. या असल्या लोकांना वेगळे काढून त्यांना फोडून काढतानाचे व्हिडिओ व्हायरल झाले पाहिजेत. ह्या धर्मांधांनी लक्षात ठेवावे, संचारबंदी थोड्या दिवसांसाठी आहे, नंतर आम्ही आहोतच, असा इशारा मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी शनिवारी दिल्लीतील मरकजचे आयोजन करणाऱ्या तबलिगी जमातला दिला. विशेष म्हणजे, महिनाभरापूर्वी औरंगाबादेत राज यांनी कोरोनाच्या नावाखाली सरकार लोकांना घाबरवत आहे, अशी टीका केली होती.


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी प्रथमच शनिवारी पत्रकार परिषद घेऊन या विषयावर आपली ठाम मते मांडली. राज ठाकरे म्हणाले, निवडणुकीच्या वेळेस मतदान कोणाला करावे याचे फतवे काढणारे मुल्ला-मौलवी आत्ता का गप्प आहेत, असा सवाल उपस्थित केला. या वेळी लोकांना घरात बसा असं का सांगत नाही? या लोकांना आतूनच पाठिंबा असतो. संशय निर्माण करणारी परिस्थिती आज मुस्लिम समाज निर्माण करतोय. जर ह्यांच्या असल्या धिंगाण्यावर उद्या सरकारने काही कडक कारवाई केली किंवा एखाद्या पक्षाने समजा काही भूमिका घेतली तर तेव्हा काही बोलायचे नाही. ह्यांचं आपल्या मराठी म्हणीप्रमाणे ‘कारलं तुपात घोळवा की साखरेत घोळवा कडू ते कडूच राहणार’ असेही ते म्हणाले.


मोदींच्या भाषणात आशेचा किरण पाहिजे


पंतप्रधानांनी सांगितले आहे की, ९ वाजता दिवे लावायचे, मेणबत्त्या पेटवायच्या. लोक पेटवतील. हा श्रद्धेचा किंवा अंधश्रद्धेचा विषय असेल. त्याच्याने परिणाम होत असेल तर कोरोनावर त्याने परिणाम होवो. परंतु, नुसते दिवे घालवून, मेणबत्त्या पेटवून, टॉर्च लावण्यापेक्षा पंतप्रधानांच्या भाषणामध्ये एक आशेचा किरण असता तरी लोकांना समाधान वाटले असते, असेही ते म्हणाले.


आर्थिक संकट येणार, शिस्तीचे पालन करा


देशभर कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी लॉकडाउन पाळला जात आहे. अशात अनेक जण बेरोजगार झाले. तर अनेकांची नोकरी संकटात आहे. सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार सुद्धा 50 टक्क्यांवर आणले आहेत. त्यामुळे, सरकारही काही करू शकणार नाही हे लक्षात ठेवा. सर्वांनी शिस्तीत राहून खर्च करा. आर्थिक शिस्त पाळली नाही तर पुढे जाउन मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागणार आहे.