मुंबई. कोरोना विरोधात लढत असताना काही वैद्यकीय उपकरणांवर लागणारा जीएसटी माफ करावा अशी मागणी उपमुख्यमंत्र्यांनी केंद्राकडे केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी यासंदर्भातील एक पत्र केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना पाठवले आहे. त्यामध्ये, त्यांनी वैद्यकीय उपकरणे जीएसटीच्या यादीतून काढण्याची मागणी केली.
उपमुख्यमंत्री तसेच महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार यांनी पाठवलेल्या वैद्यकीय उपकरणांच्या यादीत 3-प्लाय मास्क, एन-95 मास्क, पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट किट, टेस्टिंग किट, व्हेंटिलेटर आणि इतर उपकरणांचा समावेश आहे. या उपकरणांवर जीएसटी लावू नये. जेणेकरून या उपकरणांच्या किमती कमी होतील. परिणामी कोरोनाविरोधात लढण्यात मदत होईल. देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यात सर्वात वाइट परिस्थिती महाराष्ट्रात दिसून येत आहे. राज्यात दिवसेंदिवस वाढता रुग्णांचा आकडा पाहता महाराष्ट्राला जास्तीत-जास्त उपकरणे स्वस्त दरांमध्ये उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.